“मग आता ठरले ना लग्न.पुढची बोलणी करून लग्नाची तारीख काढूया ना. वरदचे बाबा बोलत होते होतते.
” आता वैष्णवी आणि वरदने एकमेकांना पसंत केलेले आहे.मग कशाला विचारात वेळ घालवायचा. ठरले समजूया लग्न.”वैष्णवीचे बाबा म्हणाले.
वरद आणि वैष्णवी दोघे भिन्न संस्कृतीत वाढलेले दोघेजण वरद नाशिकला राहणार आणि नाशिकमध्येच वाढलेला वैष्णवी मात्र कारंजा सारख्या गावात वाढलेली तिने गावातल्याच कॉलेज आतून बीए केलेले होते.
वैष्णवीच्या बाबांचे कारंजामध्ये दुकान होते.
वरद मात्र नाशिकला वाढलेला. त्याचे बाबा एका कंपनीत नोकरी करणारे आणि तो स्वतः एम. काॅम.करून एका सीए फॉर्म मध्ये नोकरीला होता.
लग्न करुन वैष्णवी नाशिकला आली. नव्या नवलाईचे दिवस संपले. घर सांभाळण्यासाठी सासुबाई सक्षम होत्या. वैष्णवी त्यांना मदत करत या घरच्या चालीरिती,स्वयंपाकाची तंत्रे सांभाळत होती. तरी बराच वेळ मोकळा मिळायचा.
वैष्णवीने फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला होता. त्या आधारावर तिने एके दिवशी रात्री जेवणानंतर सारेजण निवांत बसले असतांना विचारले,
” आई – बाबा! वरद! मी एखाद्या बुटिकमध्ये नोकरी करु का? मनही रमेल. आणि शहरात वावरायचा अनुभवही येईल.”
“हो ,हो ! नक्की कर.” सर्वांच्या वतीने सासर्यांनी होकार दिला.
“माझ्या एका मैत्रिणीचे बुटिक आहे. तिला विचारते मी.” सासुबाईंनीही पाठिंबा दिला.
वैष्णवी खुश झाली. थोड्या प्रयत्नांनी तिला बुटिकमध्ये नोकरी मिळाली.सुरवातीला बारा हजार पगार असणार होता.पण वैष्णवी खुश होती.
नोकरी सुरुझाली. एक महिना पटकन संपला. त्यानंतर दोन – तीन दिवसात वैष्णवीला पगार मिळाला.
आयुष्यातली पहिली कमाई. वैष्णवीने जाता जाता घराजवळच्या देवळात जाऊन देवाला नमस्कार करून,पेढ्याचा प्रसाद दाखवून आली. ते पेढे घरी घेऊन ती घरी आली.
” आई ,बाबा ,वरद आज मला माझा पहिला पगार मिळाला. त्यातून मी हे पेढे आणले आहेत. येताना आपल्या घरा जवळच्या देवळात जाऊन, देवापुढे पगाराच्या पाकिट ठेवून, त्याला नमस्कार करून आली. आणि त्याचे आभार मानून आली. मंदिरातही थोडेसे दानही दिले.”
” अरे वा! छान छान .अभिनंदन बर का! अशीच प्रगती करत रहा”नमस्कारासाठी वाकलेल्या वैष्णवीला,आशीर्वाद देत तिचे सासरे म्हणाले.
वैष्णवीच्या सासूबाईंनाही आनंद झाला होता.
” सुखात रहा बाळा” नमस्कार करणाऱ्या वैष्णवीला त्यांनी आशीर्वाद दिला.
” छान वैष्णवी अभिनंदन!” वरद म्हणाला.
” बाबा हे घ्या माझे पगाराचे पैसे.” वैष्णवी सासऱ्यांच्या हातात पैसे देत म्हणाली.
” बाळ अग ही तुझी कमाई आहे. बँकेत भरून टाक बघू.”वैष्णवीचे सासरे म्हणाले.
” अहो बाबा इथे माझे अकाउंटच नाही ना, आणि मला कशाला लागतात पैसे. तुम्ही परत देताच ना मला.वरदही देत टसतात.”वैष्णवी म्हणाली.
“ते तर चालुच राहिल. पण ही बाय तुझी कमाई आहे.तुझे आर्थिक स्वातंत्र्य जपले गेले पाहिजे. असे कर वरद! उद्या हिला तुझे ज्या बँकेत अकाउंट आहे, तिथे तिलाही अकाउंट उघडून दे ,पैसे भरा तिथे आणि नंतर ठरवू काय करायचे ते .” सासरेबुवांनी वरदला सांगितले.
दुसऱ्या दिवशी वरच सोबत जाऊन वैष्णवी ने बँकेत अकाऊंट उघडले. सासर्यांनी सांगितल्याप्रमाणे थोडे पैसे स्वतःजवळ खर्चासाठी ठेवून, उरलेले बँकेत भरले.
रात्री जेवण झाल्यावर सगळेजण बसले असताना, तिचे सासरे म्हणाले,
वैष्णवी आता तू आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र झालेली आहेस. तुला तुझ्या पैशांचं नियोजन करता आलं पाहिजे. मला कल्पना आहे ,की लग्नाआधी तुला ही सवय नसेल. तुमच्या घरातले व्यवहार तुझे बाबाच सांभाळत असतील, पण इथे आम्ही वरदलाही, त्याची त्याची मॅनेजमेंट शिकवली, तशी तुलाही शिकवणार बरं का!”सासरे म्हणाले.
“हो हो बाबा चालेल ना. सांगा ना मला.” वैष्णवी म्हणाली.
” हे बघ !साधारण तुला बारा हजार पगार आहे. त्यामुळे त्यातले अडीच हजार रुपये तुझे सेव्हिंग झाले पाहिजे. सध्या तुझ्यावर काही फारशी आर्थिक जबाबदारी नाही. त्यामुळे तू म्युचल फंड मध्ये याची एसआयपी चालू कर.”सासरे म्हणाले.
” पण म्युचल फंड मध्ये पैसे टाकायला तर खूप पैसे लागतात ना.” वैष्णवीने विचारले.
” नाही ग! अगदी पाचशे रुपयांपासूनही तू एसआयपी चालू करू शकतेस,म्युचल फंड मध्ये. फक्त एकाच म्युचल फंड मध्ये न टाकता, आपण 1000 च्या दोन आणि 500 ची एक असे विभागून टाकायला सांगुया. आम्ही ज्यांच्याकडून इन्व्हेस्टमेंट करतो, त्यांच्याकडेच तुला पाठवतो. तो तुझ्याकडून व्यवस्थित फॉर्म वगैरे भरून घेऊन, तुझ्या एसआयपी सुरू करून देईल. पाच हजार रुपये समज तुला तुझ्या व्यक्तिगत खर्चासाठी लागतील.कधी घरात तू काही सामान आणतेस. तुला स्वतःला काही घ्यावसं वाटलले तर बरोबर ना.”सासरे म्हणाले.
” हो हो बाबा चालेल.तुम्ही माझा इतका विचार करता याचाच मला खूप आनंद आहे.” वैष्णवी म्हणाली.
” उरलेले 5000 असं समज की तू इतर खर्चासाठी ठेवतेस.पण सध्या बँकेतच ठेव. सध्या तर घरात काही तू खर्च देण्याची आवश्यकता नाही.”सासरे म्हणाले.
” बाबा पुढच्या महिन्यापासून ठेवीन मी हे 5000 वेगळे. या महिन्यात मात्र मला तुम्हा सगळ्यांसाठी आणि माझ्या आई-बाबांकडच्यांसाठीही थोडेसे गिफ्ट घ्यायचे आहेत.”वैष्णवी म्हणाली.
” हो हो चालेल. पहिल्या कामातून तुला वाटणारच की सगळ्यांसाठी काहीतरी घ्यावे .नंतर मात्र ते साचवत रहा. कधीतरी तुम्हालाच कुठे ट्रिपला जावेसे वाटले. काही अचानक आरोग्य विषयक खर्च उद्भवला, काही अडचण आली तर म्हणून उपयोग पडतील.वीस हजार झाले की त्याची एफ डी करायची. जसे जसे तुझे उत्पन्न वाढेल, तसे याच प्रमाणात आर्थिक नियोजन करत राहायचं बरं.शिकवु तुला. “वरदही वैष्णवीला सांगत होता. तो सीए कडेच काम करायचा ना.
” हो बाबा तुमच्या सानिध्यात मी ह्या गोष्टी चांगल्या शिकणार याविषयी खात्रीच आहे मला.” वैष्णवी हसत हसत म्हणाली .
“आई उद्याचालाल का माझ्यासोबत, संध्याकाळी शॉपिंगला.आपण सगळ्यांसाठी छान छान वस्तू, घेऊन येऊयात .”वैष्णवीने सासुबाईंना विचारले.
“ती कशाला नाही म्हणणार आहे, खरेदीला.” सासरे म्हणाले.
उद्या तुमची खरेदी झाली की काॅल करा. मी आणि बाबा येऊ आणि आपण बाहेरच जाऊ जेवायला.वैष्णवीच्या पहिल्या पगारानिमित्त माझ्याकडुन पार्टी.” वरद म्हणाला.
दुसर्या दिवशी छानशी खरेदी, बाहेरच जेवणे करुन सारे आनंदात घरी परतले.
वैष्णवीला तिच्या पगाराचं नियोजन, तिच्या सासरच्यांनी जसं शिकवलं तसं तुम्हालाही कोणी शिकवलंय का?
भाग्यश्री मुधोळकर